Chhatrapati Sambhajinagar News : बस चालविण्याचा परवाना (लायसन्स) सोबत नसल्याने विभागीय वाहतूक अधीक्षकांनी एसटी महामंडळाच्या बसचालकास 3 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक अधिक्षकांनी केलेल्या या कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : बस चालविण्याचा परवाना (लायसन्स) सोबत नसल्याने विभागीय वाहतूक अधीक्षकांनी एसटी महामंडळाच्या बसचालकास 3 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक अधिक्षकांनी केलेल्या या कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकात एकच खळबळ उडाली आहे. विभागीय वाहतूक अधीक्षकांनी बसचालकास दंड लावल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वैजापूर आगारात कार्यरत असलेले बसचालक रावसाहेब भिमाजी खंडेझाडे हे 26 ऑक्टोबर रोजी श्रीरामपुर ते वैजापूर बस क्रमांक (एमएच-20-बीएल-1893) घेवून सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास जात होते. लाडगाव जवळ विभागीय वाहतूक शाखेच्या भरारी पथकाने बस थांबवून बसमधील प्रवाशांची तपासणी केली. तसेच पथकाने चालक आणि वाहकाची देखील तपासणी केली. त्यावेळी बसचालक खंडेझाडे यांच्याजवळ बसचालविण्याचा परवाना (लायसन्स) सोबत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पथक प्रमुख व्ही.एन.चौधरी यांनी बसचालक रावसाहेब खंडेझाडे यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करीत त्यांना 3 हजार 600 रुपये दंडाची पावती दिली. विभागीय वाहतूक अधिक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षकांनी केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकात एकच खळबळ उडाली आहे.
प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करावा
भरारी पथकाने बसचालक रावसाहेब खंडेझाडे यांच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक असून दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करुन कमीत कमी दंड घ्यावा अशी मागणी एसटी कष्टकरी जनसंघाचे मराठवाडा प्रदेश सचिव सुरेश जाधव यांनी केली आहे.