गंगापूर : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्यांच्या बोटी जप्त करण्याची कारवाई गंगापूर पोलिसांनी बुधवार, 31 डिसेंबर रोजी केली. गंगापूर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

गंगापूर तालुक्यातील अमळनेर शिवारातील गोदावरी नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसापासून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करण्यात येत होता. गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक औदुंम्बर म्हस्के, बिट अंमलदार विजय पाखरे, गणेश जाधव, भागवत खाडे, संदीप राठोड आदींच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास अमळनेर शिवारातील गोदावरी नदीतून उपसा केलेली वाळू बोटीतून प्रवरासंगमकडे नेणाऱ्यांचा पाठलाग करुन पकडले. पोलिसांना पाहताच बोटीवरील कर्मचारी व चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अवैधरित्या वाळूचा उपसा करुन वाहतूक करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा पोलिस कसून शोध घेत असून आरोपी अटक झाल्यावर आणखी काही बडे मासे गळाला लागतील असे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी सांगितले.