Ambadas Danve’s meeting with the Nagare family: पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी स्व. कैलास नागरे यांनी शेतीच्या पाण्यासाठी दिलेले आत्मबलिदान कधीही विसरतात येणारे नाही, त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सैल आता कामा नये, हा लढा पुढे सुरू ठेवून पाणी मिळेपर्यंत शांत बसू नका, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्व. नागरे यांना खरी आदरांजली दिली जाईल, असे सांगत कैलास नागरेंनी सुरू केलेल्या आंदोलनाची सैल सुटू देऊ नका असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवनी आरमाळ येथील शेतकऱ्यांना केले.
नंदकिशोर देशमुख/अंढेरा : पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी स्व. कैलास नागरे यांनी शेतीच्या पाण्यासाठी दिलेले आत्मबलिदान कधीही विसरतात येणारे नाही, त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सैल आता कामा नये, हा लढा पुढे सुरू ठेवून पाणी मिळेपर्यंत शांत बसू नका, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्व. नागरे यांना खरी आदरांजली दिली जाईल, असे सांगत कैलास नागरेंनी सुरू केलेल्या आंदोलनाची सैल सुटू देऊ नका असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवनी आरमाळ येथील शेतकऱ्यांना केले. २७ मार्चच्या सकाळी नागरे कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. याप्रसंगी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत दानवेंनी पाच लाखांची आर्थिक मदत दिली.
होळीच्या दिवशी कैलास नागरे यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी त्यांनी चार पानांची चिठ्ठी लिहिली, अंढेरा मंडळातील १४ गावांना सिंचनासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी मिळावे, ही मागणी त्यांनी मांडली. गत वर्षातील डिसेंबर महिन्यापासून या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी शेवटी लिहिलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली. नागरे हे पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी असून, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी त्यांनी लढा पुकारला होता. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे हे गुरुवारी सकाळी शिवनी आरमाळ येथे पोहोचले. यावेळी त्यांनी गावातील शेतकऱ्यांकडून खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी मिळण्याची मागणी समजून घेतली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी त्यांच्याशी बातचीत केली. नागरे कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत स्वाधीन करीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी मेहकरचे आ. सिद्धार्थ खरात, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत, जयश्री शेळके, संदीप शेळके यांस अन्य पदाधिकारी उपस्थित होते.