वाशिम : रिसोड पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गावी (जळगाव जामोद) परतताच अटक करून त्याच्याकडून १,६८,८०० रुपयांच्या ३ ई-स्कूटी जप्त करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांची ही कारवाई या महिन्यातील पाचवी उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

वाशिम : रिसोड पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गावी (जळगाव जामोद) परतताच अटक करून त्याच्याकडून १,६८,८०० रुपयांच्या ३ ई-स्कूटी जप्त करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांची ही कारवाई या महिन्यातील पाचवी उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ऋत्वज संजय जिरवणकर (रा. रिसोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, परवेज युसूफ देशमुख, सादिक देशमुख व शेख तनवीर शेख हारुण (सर्व रा. जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांनी संगनमत करून जिरवणकर ई-मोटर्स दुकानातून ३ ई-स्कूटी फसवणुकीने घेऊन थकवले होते. या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यांची सवय असलेल्या आरोपींनी मुंबईसारख्या शहरांत वास्तव्य करून पोलीसांना दिशाभूल केली होती. तसेच वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरून तपासात अडथळा आणला होता. मात्र, ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू ठेवला. आरोपी परवेज युसूफ देशमुख हा गुप्तपणे जळगाव जामोद येथे परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि ३ ई-स्कूटींबाबत माहिती दिली. त्यानुसार, १.६८ लाख रुपयांच्या स्कूटी जप्त करण्यात आल्या. आरोपी परवेज देशमुख सध्या पोलीस कोठडीत असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे आणखी गुन्हे केल्याची शक्यता असून, तपास अधिक गतीने सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, हवालदार प्रशांत राजगुरू, अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, सुनिल तिवाले तसेच सायबर सेलच्या मेघा मनवर यांनी विशेष भूमिका बजावली.
