सिंदखेड राजा : पंढरपूरच्या धर्तीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतही जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शासकीय महापूजा व्हावी, मुख्यमंत्र्यांनी सपत्नीत पूजेला हजर रहावे, अशी मागणी विधान परिषदेचे आ. अमोल मिटकरी यांनी केली.
सिंदखेड राजा : पंढरपूरच्या धर्तीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतही जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शासकीय महापूजा व्हावी, मुख्यमंत्र्यांनी सपत्नीत पूजेला हजर रहावे, अशी मागणी विधान परिषदेचे आ. अमोल मिटकरी यांनी केली. १२ जानेवारी रोजी येथील जिजाऊ जन्मस्थळी अभिवादन करण्याकरीता ते आले होते.
स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे जन्म ठिकाण असलेल्या सिंदखेडराजा नगरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणीही मिटकरी यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, महाराष्ट्राला ऐतिहासिक ठेवा प्राप्त झाला असताना, त्या त्या वस्तूंचे संवर्धन होणे गरजेचे आहे. स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा नगरीचा विकास आराखडा वर्षानुवर्षे रखडलेला आहे. या विकास आराखड्याला चालना मिळावी, जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून सिंदखेड राजाची घोषणा करावी जेणेकरून परदेशातील नागरिक देखील आपल्या ज्वलंत इतिहासाचा अभ्यास करू शकतील. यासाठी, राज्य शासनाने पुढाकार घेऊन तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, आतापर्यंत केवळ घोषणा झाल्यात मात्र, खऱ्या अर्थाने अंमलबजावणीची आवश्यकता असून, त्यादृष्टीने पावले उचलल्या गेली पाहिजेत, असेही आ. मिटकरी म्हणाले.
पोलिसांचा केला निषेध
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ प्रेमी सिंदखेडराजात दाखल होतात. मात्र, ५ ते ६ किलोमीटर दूरपर्यंत पोलिसांनी बॅरिकेट लावल्यामुळे, अनेक जण राजवाडा परिसरापर्यंत पोहोचत नाही. पोलिसांकडून , जाणीवपूर्वक हे केले जात असेल तर, पोलिसांचा मी निषेध करतो. मोठ्या आस्थेने हजारो शिवभक्त जिजाऊ नगरीत येतात मात्र, त्यांची जर निराशा होत असेल तर हे अतिशय चुकीचे आहे. असेही मत मिटकरी यांनी व्यक्त केले.