प्रयागराज : पौष पौर्णिमेच्या स्नानाने सोमवारी महाकुंभ मेळा सुरू झाला. सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १.६० कोटी भाविकांनी गंगा आणि संगममध्ये धार्मिक स्नान केले.

प्रयागराज : पौष पौर्णिमेच्या स्नानाने सोमवारी महाकुंभ मेळा सुरू झाला. सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १.६० कोटी भाविकांनी गंगा आणि संगममध्ये धार्मिक स्नान केले. भाविकांवर 20 क्विंटल फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. 144 वर्षात दुर्मिळ खगोलीय संयोगाने महाकुंभ होत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक, संत, कल्पवासी आणि पर्यटकांचे स्वागत केले. त्यांनी महाकुंभ हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचे प्रतीक असल्याचे वर्णन केले. मेळा प्रशासनाने सांगितले की, २०२५ च्या महाकुंभातील पहिल्या स्नान महोत्सवाच्या पौष पौर्णिमेनिमित्त सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १.६० कोटी भाविकांनी गंगा आणि संगममध्ये स्नान केले. पौष पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याचे महत्त्व स्पष्ट करताना, तीर्थयात्री पुजारी राजेंद्र मिश्रा म्हणाले की, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या १५ व्या दिवशी म्हणजेच पौष पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे धुऊन जातात. ते म्हणाले, महिनाभर चालणाऱ्या कल्पवासाची सुरुवातही 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेने झाली. या काळात, लोक महिनाभर दिवसातून तीन वेळा गंगेत स्नान करून आणि परमेश्वराची स्तुती करण्यासाठी स्तोत्रे गाऊन एक प्रकारचे कठोर जीवन जगतात.
श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती एकत्र : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक खास दिवस आहे. महाकुंभ २०२५ प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे, जिथे असंख्य लोक एका पवित्र संगमासाठी एकत्र येतील. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती एकत्र येत आहेत. महाकुंभ हे भारताच्या शाश्वत वारशाचे प्रतीक आहे. तेथे स्नान करण्यासाठी आणि संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या असंख्य लोकांना पाहून मी भारावून गेलो आहे, असे मोदी म्हणाले.