एआयच्या जादूने जुन्या आठवणींना नवा साज !

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर सध्या १९८० च्या दशकातील छायाचित्रांच्या शैलीचा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला आहे. आधुनिक काळातील आपला फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने 1980 च्या दशकातील असल्यासारखा तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची क्रेझ वाढली आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्ससारख्या माध्यमांवर अशा रेट्रो फोटोंचा अक्षरशः पूर आला आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून राजकारणी, उद्योजक आणि समाजकारण्यांपर्यंत ‘रेट्रो लूक’ ची भुरळ दिसून येतेय. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा फोटो सुध्दा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हा ट्रेंड केवळ तरुणाई किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपुरता मर्यादित राहिलेला नाही. सामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक, समाजसेवक, कलाकार आणि राजकीय नेतेही या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत. देशातील काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांनीही 1980 च्या दशकातील लूकमधील एआय किंवा प्रत्यक्ष जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या काळातील मोठ्या आकाराच्या हेअरस्टाईल, रंगीबेरंगी कपडे, रुंद कॉलर, गॉगल, दागिने, जुन्या काळातील गाड्या, स्टुडिओ बॅकग्राउंड आणि फिल्म कॅमेऱ्याची धुसर पोत यांचा वापर केला जातो. त्यामुळे काही फोटो पाहिल्यावर ते खरोखरच चार दशकांपूव काढले असावेत, असा भास निर्माण होतो.

महाराष्ट्रातही या ट्रेंडची मोठी चर्चा सुरू असून आमदार, खासदार आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे रेट्रो फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित नेते, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे फोटोही या शैलीत तयार करून शेअर केले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या पोस्टनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम
या ट्रेंडचे वैशिष्ट्य म्हणजे ‘नॉस्टॅल्जिया’ आणि आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा संगम. ज्यांनी 1980 चे दशक प्रत्यक्ष अनुभवले आहे त्यांच्यासाठी हा ट्रेंड जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरत आहे, तर नव्या पिढीसाठी त्या काळाची फॅशन आणि जीवनशैली अनुभवण्याची डिजिटल संधी निर्माण झाली आहे. काही नेत्यांनी मात्र एआय फोटोऐवजी त्या काळातील स्वतःचे खरे फोटो शेअर करून या ट्रेंडला वेगळाच रंग दिला आहे.
मी कसा दिसत होतो ?
एकंदर, ‘80 च्या दशकात मी कसा दिसत होतो?’ या उत्सुकतेतून सुरू झालेला हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावरील मनोरंजन, आठवणी आणि एआयच्या सर्जनशील वापराचा नवा नमुना ठरत आहे. मराठवाड्यातील अनेक नेते आमदार या ट्रेंडचा आनंद घेतांना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर समीर राजूरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक अशोक पवार, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष मनोज गायके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सुध्दा ‘80 च्या दशकात मी कसा दिसत होतो?’ या उत्सुकतेतून समाज माध्यमांवर आपले फोटो शेअर केले आहेत.


