अडोळी : वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी पांदण रस्त्याची दुरुस्ती करून नदीवर पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान अडोळी येथील नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अडोळी ते अटकळी हा पांदण रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढतात.
या रस्त्याची दुरुस्ती तसेच नदीवर पूल बांधण्याबाबत संबंधित प्रशासनाला यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जलसमाधी आंदोलनाचे पाऊल उचलले. आंदोलनात संघटनेचे सतीश इढोळे, प्रभू इढोळे, परशुराम कोंघे, अरुण इढोळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
अडोळी–अटकळी पांदण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नदीवर पूल उभारावा आणि शेतकऱ्यांना वर्षभर सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.