वाशिम : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मानोली-मोतसावंगा मार्गावर कारवाई करत गोवा राज्यात विक्रीस असलेला आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा व चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ८५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शनाखाली ४ जुलै रोजी मंगरुळपीर तालुक्यातील मानोली ते मोतसावंगा रोडवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत तपासणी करण्यात आली असता, एमएच ४७ ए ३६११ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या मेगा एक्सएल बंदिस्त वाहनातून गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत १८० मिली क्षमतेच्या रॉयल चॅलेंज व्हिस्की, आयकॉनीक व्हाईट व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की या ब्रँडच्या ३६० सीलबंद बाटल्या (८ पेट्या) तसेच ७५० मिली क्षमतेच्या रॉयल क्वीन व्हिस्की आणि गोल्ड अँड ब्लॅक एक्सएक्सएक्स रमच्या १४४ सीलबंद बाटल्या (१२ पेट्या) असा एकूण २० पेट्यांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिगंबर रमेश पवार (वय ३७, रा. भिलडोंगर, ता. मानोरा, ह.मु. शिवाजी नगर, वाशिम) आणि प्रविण भगवानदास वर्मा (वय ५०, रा. सोनखास, ता. मंगरुळपीर) यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत निरीक्षक एम. के. उईके, दुय्यम निरीक्षक सु. दी. चव्हाण, मधुकर जाधव, आर. पी. मनवर तसेच जवान निवृत्ती तिडके, नितीन चिपडे, ललित खाडे, स्वप्नील लांडे, विष्णू मस्के, गणेश नानोटे, निकेश घुले, महिला जवान वैष्णवी सारघोडे, वाहन चालक संजय मगरे व गणेश सपकाळ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास मधुकर जाधव करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना विनापरवाना मद्य बाळगणे, वाहतूक करणे अथवा विक्रीबाबत माहिती असल्यास विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.