खामगाव : घरफोडी करून पाच लाख वीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला डी.बी. पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.

खामगाव : घरफोडी करून पाच लाख वीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला डी.बी. पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.
शिवाजीफैल परिसरातील रहिवासी योगेश प्रभाकर केवारे (४०) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान ते कार्यक्रमानिमित्त घराबाहेर गेले होते. याचवेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याची कड़ी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप उघडून त्यामध्ये ठेवलेली ५ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी खामगाच शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक व भौतिक पुरावे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे ओम अनिल माने (रा. शिवाजीफैल, खामगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ९ जून रोजी आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली ५ लाख २० हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वात पोउपनि अमित तळोले, पोहेकॉ संदीप टाकसाळ, देवेंद्र शेळके, निलसिंग चव्हाण, प्रवीण गायकवाड, केशव झाल्टे, मपोको सुवर्णा कदम तसेच चालक नापोको नितीन भालेराव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


