जालना : पिण्याच्या पाण्यासाठी जालनाकरांना आधीच आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत असताना आता ऐन उन्हाळ्यात जालना महानगरपालिकेने अंबड महामार्गावरील इंदेवाडी परिसरातील अनधिकृत नळकनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

जालना : पिण्याच्या पाण्यासाठी जालनाकरांना आधीच आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत असताना आता ऐन उन्हाळ्यात जालना महानगरपालिकेने अंबड महामार्गावरील इंदेवाडी परिसरातील अनधिकृत नळकनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कारवाईमुळे इंदेवाडी, लक्ष्मीकांत नगर आदी भागांतील अनेक कुटुंबांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बुधवार, 29 एप्रिल रोजी या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

जालना-अंबड मार्गावरील मुख्य जलवाहिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत नळकनेक्शन जोडले गेले होते. मात्र या प्रकाराकडे महानगरपालिका प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पाच ते सात वर्षे कोणतीही कारवाई न करता आता अचानक मोहीम राबवून कनेक्शन तोडल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहरात आधीच पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच अंबड रोड परिसरातील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्याने पाण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत पर्यायी व्यवस्था न करता थेट कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याने महिलांसह नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
कारवाईदरम्यान “आधी पाणी द्या, मग कनेक्शन तोडा” अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी महिलांनी व स्थानिकांनी महानगरपालिकेच्या पथकाला जाब विचारला. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अनधिकृत कनेक्शनकडे इतकी वर्षे दुर्लक्ष का केले? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच भर उन्हाळ्यात पर्यायी व्यवस्था न करता नागरिकांना पाण्याविना ठेवण्याचा अधिकार महानगरपालिकेला कोणी दिला, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
महानगरपालिकेकडून पाणी चोरी रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले जात असले, तरी नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.


