करमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी परिसरातील डी सेक्टर, प्लॉट क्रमांक १६२ (गोकुळवाडी) येथे असलेल्या ‘तिरुपती इंटरप्रायजेस’ या प्लास्टिक दाणा निर्मिती करणाऱ्या कंपनीत बुधवार, २९ एप्रिल रोजी पहाटे सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दहा तासांनंतर आगीवर नियंत्रण; लाखो रुपयांचे नुकसान
करमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी परिसरातील डी सेक्टर, प्लॉट क्रमांक १६२ (गोकुळवाडी) येथे असलेल्या ‘तिरुपती इंटरप्रायजेस’ या प्लास्टिक दाणा निर्मिती करणाऱ्या कंपनीत बुधवार, २९ एप्रिल रोजी पहाटे सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुधवारी सकाळी कामकाज सुरू होण्याची वेळ असल्याने कंपनीत काही मोजकेच कामगार उपस्थित होते. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर धाव घेत सुरक्षितता साधली. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या कच्च्या मालाने पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ व धूर दूरवरून दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळ गोकुळवाडी हा दाट लोकवस्तीचा भाग असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलत आजूबाजूची घरे रिकामी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच शेंद्रा एमआयडीसी अग्निशमन दलासह छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अग्निशमन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी एकूण सहा अग्निशमन बंब तसेच १५ ते २० पाण्याचे टँकर वापरण्यात आले. प्लास्टिकचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वारंवार भडकत होती.
पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी परिसरातील ट्रॅक्टर टँकर्सची मदतही घेण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत शर्थीने व समन्वयाने काम करत सुमारे दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. मुख्य अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जवान संजय राठोड, तेजस खाचणे, गणेश उगले, विकास सूर्यवंशी, संजय जाधव, सुनील वंजारे यांच्यासह २० ते २५ अग्निशामक जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.


