वाशिम : जिल्ह्यात शासकीय सेवांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस सेवा केंद्रांविरोधात जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत ६ अनधिकृत केंद्रांवर छापे टाकले. या सरप्राईज तपासणीमुळे अनधिकृत व्यवसायांना मोठा धक्का बसला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आकाश वर्मा व जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांच्या नेतृत्वाखाली वाशिम शहरासह अनसिंग येथे अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या तपासणीदरम्यान ६ सेवा केंद्रे अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित केंद्रांवर तात्काळ कारवाई करत दिशाभूल करणारे फलक व जाहिराती काढून टाकण्यात आल्या. तसेच या केंद्रांकडून वापरल्या जाणाऱ्या युजर आयडी निष्क्रिय (डिसेबल) करण्याचा प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रशासनाने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या बोगस सेवा केंद्रांविरुद्धची मोहीम पुढील काळात आणखी तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी शासकीय सेवांसाठी केवळ अधिकृत सेवा केंद्रांचाच वापर करावा आणि शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापलीकडे कोणतेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत, असे ठाम आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कुठल्याही प्रकारची संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.