तेल्हारा : तालुक्यात एका रात्रीत घडलेल्या दोन गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धारदार शस्त्राने हल्ला आणि पोटच्या मुलाकडून वडिलांची हत्या अशा दोन स्वतंत्र घटनांनी नागरिकांना हादरवून सोडले आहे. दरम्यान, पित्याच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केल्याने प्रकरणाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे.

गोकुळ हिंगणकर / तेल्हारा : तालुक्यात एका रात्रीत घडलेल्या दोन गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धारदार शस्त्राने हल्ला आणि पोटच्या मुलाकडून वडिलांची हत्या अशा दोन स्वतंत्र घटनांनी नागरिकांना हादरवून सोडले आहे. दरम्यान, पित्याच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केल्याने प्रकरणाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे.
बेलखेड येथे घडलेल्या घटनेत दीपक रामदास चतुरकार याने त्याचे वडील रामदास सहदेवराव चतुरकार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, सोमवार २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता माहिती मिळताच हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, पोहेकॉ प्रफुल पवार आणि पोहेकॉ प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. दहिगांव फाटा ते पंचगव्हाण फाटा परिसरातून पळून जात असताना आरोपीला शिताफीने पकडत अवघ्या दोन तासांत ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन राठोड करत आहेत.
अज्ञातावर जीवघेणा हल्ला
तेल्हारा : घोडेगाव मार्गावरील अग्रवाल फार्म हाऊस परिसरात रात्री सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीवर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. संबंधित व्यक्तीच्या छातीवर, पायावर तसेच डोक्याच्या पुढील व मागील भागावर गंभीर वार करण्यात आले होते. जखमी व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. गाडेगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे जखमीला तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.


