Dr Punjabrao Deshmukh : अकोल्यातील श्री शिवाजी विद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांची ६१ वी पुण्यतिथी साजरी. मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि स्पर्धेतील पारितोषिक वितरण.

अकोला : श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा, अकोला येथे १० एप्रिल २०२६ रोजी लोकमहर्षी, शिक्षणमहर्षी व कृषीमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश अंधारे (शाळा तपासणी अधिकारी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते प्रा. अभय तायडे (सांख्यिकी विभाग, बडनेरा-अमरावती), अपर्णाताई धोत्रे (नवनिर्वाचित संचालक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक), कल्पनाताई देशमुख (प्रांताध्यक्षा, लीनेन्स क्लब अकोला) तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान ‘हे लोकमहर्षी युगपथदर्शी…’ या गीताद्वारे भाऊसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या कार्याचा आढावा मांडला.
यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. अपर्णाताई धोत्रे यांनी संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तर कल्पनाताई देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. प्रा. अभय तायडे यांनी भाऊसाहेबांचे इतर समाजसुधारकांशी असलेले सलोख्याचे संबंध स्पष्ट केले. अध्यक्ष प्रकाश अंधारे यांनी विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांच्या शिक्षणाच्या विचारधारेवर चालण्याचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, भाऊसाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवी गटात विशाखा कसबे, श्रावणी आठवले, आराध्या इंगळे, तर इयत्ता नववी ते बारावी गटात निशा जाधव, अक्षरा इंगळे, सीमा शेजुळ यांनी यश संपादन केले. अक्षरा इंगळे हिला विशेष मनोगतासाठी प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेचा निकाल ज्येष्ठ शिक्षक तायडे यांनी जाहीर केला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


