accident on Kalyan-Ahilyanagar highway : कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 11 प्रवाशी ठार झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले.

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक
मुंबई : कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 11 प्रवाशी ठार झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांत तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते.
कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 11 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले. या घटनेत इतर दोन जणही गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांत आठ पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ती माहिती महामार्ग पोलिस व स्थानिक टिटवाळा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांनी कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले. घटनास्थळी रक्तामांसाचा अक्षरशः सडा पडला होता.
नेमकी कशी घडली घटना?
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील गोविली गावालगतच्या रायता पुलावर सकाळी 10.45 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती सोमवारी सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 11 ते 12 जण प्रवास करत होते. या कारला समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.


