गर्भपात व कामोत्तेजक औषधांचा अवैध साठा जप्त; अनसिंग येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई

वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने  अन्न व औषध प्रशासन, वाशिम कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने अनसिंग येथे मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत गर्भपाताशी संबंधित औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री तसेच कामोत्तेजक स्वरूपाच्या ऍलोपॅथिक औषधांचा अवैध साठा उघडकीस आला असून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली आहे.

वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने  अन्न व औषध प्रशासन, वाशिम कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने अनसिंग येथे मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत गर्भपाताशी संबंधित औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री तसेच कामोत्तेजक स्वरूपाच्या ऍलोपॅथिक औषधांचा अवैध साठा उघडकीस आला असून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली आहे.

प्राप्त गोपनीय माहितीनंतर मे. आई मेडिकल स्टोअर, अनसिंग येथे डमी ग्राहक पाठविण्यात आला. संबंधित ग्राहकाने गर्भपातासंदर्भातील औषधांची मागणी करताच कोणतेही वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन न पाहता औषध विक्री करण्यात आली. ही विक्री करताना औषध विक्रेता किशोर नामदेव डोके रंगेहात आढळून आला. यानंतर औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी औषध आस्थापनेची सविस्तर तपासणी केली. तपासणीदरम्यान आवश्यक खरेदी-विक्री नोंदी, बिल, स्टॉक रजिस्टर किंवा अन्य कायदेशीर कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. संबंधित ठिकाणी गर्भपाताशी संबंधित औषधांचा साठा आढळून आला असून तो पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. नमुने शासकीय औषध विश्लेषण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.गर्भपात औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री तसेच बेकायदेशीर औषध साठा हे सार्वजनिक आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेस गंभीर धोका निर्माण करणारे प्रकार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम तसेच लागू कायद्यांतर्गत कठोर दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.

स्त्री भ्रूण हत्या, लिंगनिवड आणि बेकायदेशीर औषध व्यवहारांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्यात आले असून भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. 

घरातून सापडला कामोत्तेजक औषधांचा अवैध साठा

अनसिंग येथील कारवाईनंतर संशयाच्या आधारे सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानी तपासणी केली. या तपासणीत कामोत्तेजक स्वरूपाच्या ऍलोपॅथिक औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. या साठ्यामध्ये एकूण २५३ स्ट्रिप जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजित किंमत सुमारे २० हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही वैध औषध विक्री परवान्याशिवाय हा साठा ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने तो पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला आहे. नमुने विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »