४ लाख एकर शेती प्रभावित; प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार  : पालकमंत्री भरणे

वाशिम : गत चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात तब्बल २ लाख १० हजार शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख ३७ हजार ६१९ एकर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, शासन या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, बाधित शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई लवकरच वितरित होईल,  असे आश्वासन कृषी तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  दिले.

अमानी येथील अतिवृष्टीग्रस्त शेतपरिसराची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद

 वाशिम : गत चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात तब्बल २ लाख १० हजार शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख ३७ हजार ६१९ एकर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, शासन या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, बाधित शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई लवकरच वितरित होईल,  असे आश्वासन कृषी तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  दिले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी २० सप्टेंबर रोजी  मालेगाव तालुक्यातील अमानी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतपरिसराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणीवेळी आमदार अमित झनक, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, अतुल जावळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, सलग अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक संकटाला धैर्याने सामोरे जाताना शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. ते पुढे म्हणाले की,   सुमारे ४ लाख ३७ हजार ६१९ एकर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय पशुधनाची हानी झाली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक बाधित कुटुंबाला मदत दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ते पुढे म्हणाले , महसूल ,कृषी तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीच्या माध्यमातून शक्य तितका दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांना तोंड देण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

 मे-जून महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. आता जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीबाबतची भरपाईदेखील लवकरच वितरित केली जाणार आहे.शेतकऱ्यांनी समोर मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना देवून शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे  पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

१५१ कोटी रुपयांचा निधी लागणार

शासन नियमाप्रमाणे सध्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी अंदाजे १५१ कोटी रूपयांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना लवकर मदत मिळणार आहे. सध्या अतिवृष्टीमुळे पंचनामे सुरू असून नुकसान क्षेत्र वाढत आहे, ज्यामुळे निधीची आवश्यकता देखील वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »