जालना : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी समाजातील नेते दीपक बोराडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून जालना शहरात आमरण उपोषण सुरू केलेले आहे. दरम्यान, शनिवार, 20 सप्टेंबर रोजी बोराडे यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले असून आता उपोषणस्थळी धनगर समाज एकवटल्याचे दिसून आले आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात उभे राहिलेले आंदोलन हे जालना येथूनच उभे राहिले आहे. यानंतर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाची सुरुवात देखील जालन्यातूनच झाली. त्यापाठोपाठ आता बंजारा समाजाच्या वतीने देखील नुकताच शहरात महामोर्चा काढून त्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे जालना शहरातील अंबड चौफुली येथे शासकीय विश्रामगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी दीपक बोराडे हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, या उपोषणस्थळी आतापर्यंत विविध राजकीय पक्ष, संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. शनिवार, 20 सप्टेंबर रोजी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वतीने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन दीपक बोराडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार डॉ. काळे यांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी भाऊसाहेब काळे, काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष अतिक खान, कृष्णा पडुळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकृती खालावली
बुधवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवारी त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस होता. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. दरम्यान, बोराडे यांच्या उपोषणाला धनगर समाजाकडून आता व्यापक जनाधार मिळताना दिसत आहे. परिणामी शनिवारी उपोषणस्थळी मोठ्या संख्येने समाज बांधव एकवटलेले दिसून आले.