वाशिम : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’मुळे अकोला परिमंडळातील हजारो कुटुंबांनी आता पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करत स्वतःच वीज निर्मितीकडे वाटचाल सुरू केली आहे.

अकोला परिमंडळात सौर ऊर्जेचा वाढता स्वीकार; वीज बिल थेट शून्यावर
वाशिम : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’मुळे अकोला परिमंडळातील हजारो कुटुंबांनी आता पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करत स्वतःच वीज निर्मितीकडे वाटचाल सुरू केली आहे. घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून तब्बल ३३ हजार ३८० वीज ग्राहक आता स्वतःच्या गरजेची वीज स्वतः तयार करत असून अनेकांचे वीज बिल थेट शून्यावर आले आहे.
पर्यावरणपूरक ऊर्जेचा स्वीकार आणि वाढत्या वीज खर्चातून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा या योजनेकडे कल वाढत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळात ग्रामीण तसेच शहरी भागातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून घराघरांवर सौर पॅनेल झळकू लागले आहेत. महावितरणकडून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलढाणा), अजय शिंदे (वाशिम) आणि प्रतिक्षा शंभरकर (अकोला) यांच्या पुढाकारातून ग्राहकांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, तांत्रिक मार्गदर्शन तसेच नेट मीटरिंग सुविधा जलदगतीने उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत असून अर्जांची संख्याही सातत्याने वाढत आहे. वाढते वीजदर, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि शासनाकडून मिळणारे अनुदान यामुळे ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून ‘वीज ग्राहक ते वीज निर्माता’ असा बदल प्रत्यक्षात दिसून येत आहे.
७८ हजारांपर्यंत अनुदान
या योजनेअंतर्गत महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा लाभ मिळत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून आकर्षक अनुदान दिले जात आहे. प्रति किलोवॅट ३० हजार रुपयांप्रमाणे पहिल्या दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी १८ हजार रुपये असे एकूण ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट जमा केले जाते. तसेच सौर प्रकल्प उभारणीसाठी बँक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिमंडळातील सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थिती
जिल्हा-ग्राहक
बुलढाणा — १४,५७६
अकोला — १२,८६४
वाशिम — ५,९४०


