मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळील हृदयद्रावक घटना

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी (५ सप्टेंबर) घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर हादरला. नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेससमोर एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या बाळासह उडी घेतल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली असून घटनास्थळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला अंदाजे २६ ते २८ वर्षांची असून तिच्यासोबत असलेल्या बालकाचे वय सुमारे तीन वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक १७६१८ नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस मुकुंदवाडी स्थानक परिसरातून जात असताना महिलेने बाळासह धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांची ओळख पटविण्याचे तसेच घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पंचनामा व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत असून, अधिकृत तपासानंतरच घटनेचे कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली. आई आणि चिमुकल्या बालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मृतांची नावे आणि इतर तपशील स्पष्ट होणार आहेत.

