पहाटे पावणेतीनच्या सुमारास थरार; पाच बाळ घाटीत, तिघे एमजीएममध्ये, एक संजीवनीत दाखल

ज्या पहिल्या मजल्यावर आग लागली, तेथे एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये जनरल वॉर्डातील ३६, तर स्पेशल स्यूटमधील १३ रुग्णांचा समावेश होता. आग लागल्यानंतर रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
छत्रपती संभाजीनगर : आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलच्या बाल अतिदक्षता विभागाला (ICU) शुक्रवारी (४ सप्टेंबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. त्यावेळी ICU मध्ये नऊ बाळांवर उपचार सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करून सर्व बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
आगीच्या घटनेनंतर पाच बाळांना घाटी रुग्णालयात, तिघांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बाळाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सर्व बाळांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. जवाहरनगर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत व स्थलांतराच्या दृष्टीने तब्बल ३० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. ज्या पहिल्या मजल्यावर आग लागली, तेथे एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये जनरल वॉर्डातील ३६, तर स्पेशल स्यूटमधील १३ रुग्णांचा समावेश होता. आग लागल्यानंतर रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आगीत ICU चे किती नुकसान झाले, याचीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालयात अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना होत्या का, याचा तपास सुरू आहे.
रेल्वेस्टेशनजवळ सिटी बसला आग; २५ प्रवाशांचा थरकाप
रेल्वेस्टेशन परिसरात गुरुवारी (३ सप्टेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास सिटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी होते. इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना मागील दरवाजातून सुरक्षित बाहेर उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
बिडकीन येथून सिटी बस (एमएच २० ईएल १९१४) रेल्वेस्टेशन येथे आली होती. चालक आणि वाहक कंट्रोल रूममध्ये नोंद करण्यासाठी गेले होते. त्यानंतर बस फुलंब्रीच्या दिशेने जाणार होती. प्रवासी बसमध्ये बसलेले असतानाच इंजिनमधून धूर निघू लागला.

