वाशिम : स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मागे पडू नयेत, यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘मिशन स्पर्धा परीक्षा’ या अभियानांतर्गत बालवयापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येणार आहेत.

वाशिम : स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मागे पडू नयेत, यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘मिशन स्पर्धा परीक्षा’ या अभियानांतर्गत बालवयापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येणार आहेत.
यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी जिल्ह्यातील निवडक शिक्षकांची बैठक घेऊन विचारमंथन केले. लवकरच शिक्षकांची समिती गठीत करून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. या बैठकीला शिक्षणाधिकारी संजय ससाने व उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव उपस्थित होते. काही राज्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. इयत्ता १०वी-१२वीपासूनच विद्यार्थ्यांना आयएएस-आयपीएस परीक्षांबाबत मार्गदर्शन केले जाते. परिणामी, उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये आघाडीवर असतात. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा परिषदेमार्फतही हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.दिवाळी, उन्हाळी सुट्टीदरम्यान तसेच शनिवार-रविवारला सुट्टी न घेता शिकवणाऱ्या शिक्षकांचे विद्यार्थी अधिक यशस्वी होतात, असे निरीक्षण शिक्षकांनी नोंदविले.
५० शिक्षकांशी साधला संवाद
जिल्ह्यातील १० आयडॉल शिक्षक आणि ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांना नवोदय, शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेची तयारी करून देणारे ४० शिक्षक अशा एकूण ५० शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आमंत्रित केले होते. या शिक्षकांशी सीईओ अर्पित चौहान यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना येणाऱ्या अडचणी व आव्हानांबाबत मनोगत व्यक्त केले. मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना सामूहिक अभ्यास पद्धतीतून मुख्य प्रवाहात आणण्याचे शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सीईओ चौहान यांनी सांगितले.
जि. प. शाळांची पटसंख्या वाढीस मदत
पुरेशी पटसंख्या नसल्याने अनेक जिल्हा परिषद शाळा बंद होण्याचे संकट आहे. मात्र, जि. प. शाळेतील विद्यार्थी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होत असल्याचे पाहून या शाळांमध्ये पटसंख्या वाढताना दिसत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.जिल्ह्यातील साखरा शाळा याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र यासाठी सर्व शिक्षकांचा सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत सीईओ चौहान यांनी व्यक्त केले.
