जालना : राजकीय पक्षाच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या नगरपालिकांसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर या पालिकांची निवडणूक होत असून या ठिकाणी कोणाचा झेंडा फडकणार हे बुधवारी स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणुकीची संपूर्ण. तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे.

जालना : राजकीय पक्षाच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या नगरपालिकांसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर या पालिकांची निवडणूक होत असून या ठिकाणी कोणाचा झेंडा फडकणार हे बुधवारी स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणुकीची संपूर्ण. तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून या तिन्ही शहरांत निवडणूक प्रचाराने धुरळा उडवून दिला होता. सोमवारी रात्री 10 वाजेनंतर निवडणूक प्रचार थांबला. प्रचारादरम्यान सभा, रॅली, आरोप-प्रत्यारोप, मतदारांना आकर्षित करण्यासाठीच्या प्रचारफेऱ्यांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले गेले. मंगळवार, 2 डिसेंबर रोजी तिन्ही ठिकाणी एकूण 98 मतदान केंद्रांवर 432 मतदान यंत्रांद्वारे मतदान होणार आहे. सुरळीत मतदानासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या तिन्ही नगर पालिकांमध्ये भाजपने ‘स्वबळावर लढणार’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे युतीतील घटक पक्ष शिंदे सेना आणि भाजप यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न देता वेगळा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा झेंडा नगर पालिकांवर फडकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अंबडमध्ये पंचरंगी लढत
अंबड नगर पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार रिंगणात असून, 29 हजार 659 मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. अंबडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी युती करून उमेदवार उभा केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आघाडीची ताकद दाखवली आहे. त्यामुळे या ठिकाणी पंचरंगी लढतीचे चिन्हे आहेत.
परतूरमध्ये 9 उमेदवार रिंगणात
33 हजार 969 मतदार असलेल्या परतूर नगर पालिका निवडणुकीत 9 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. 33 हजार 969 मतदार आज निवडणुकीचा कौल देणार आहेत. सदस्य पदासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दाखल झाली असून 91 उमेदवार रिंगणात आहेत.
भोकरदनमध्ये चुरस
भोकरदन नगर पालिकेत 7 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. येथे 20 हजार 916 मतदार मतदान करणार असून 69 उमेदवार सदस्यपदासाठी स्पर्धेत आहेत. सर्वच पक्षांनी कडवे आव्हान उभे केल्यामुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता येथे व्यक्त केली जात आहे.
