Washim Assembly Election 2024: भाजप नेत्यामूळे शिंदेंची शिवसेना घेणार वेगळी भूमिका – रवी भांदुर्गे यांचा इशारा 

Washim Assembly Election 2024

Washim Assembly Election 2024 : उमेदवारीवरुन नाराज असलेले भाजपचे अनंतराव देशमुख यांनी आपले अपक्ष नमांकन दाखल करीत बंड थोपटले आहे. दरम्यान, (शिंदे गट) शिवसेनेने जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले असून, युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी भाजपाला वेगळी भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

Washim Assembly Election 2024

गजाजन देशमुख  / वाशीम : रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या विधानपरिषद आ. भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र, उमेदवारीवरुन नाराज असलेले भाजपचे अनंतराव देशमुख यांनी आपले अपक्ष नमांकन दाखल करीत बंड थोपटले आहे. दरम्यान, (शिंदे गट) शिवसेनेने जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले असून, युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी भाजपाला वेगळी भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे. स्थानिक चिंतामणी सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
माजी खासदार, माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुख एकेकाळी काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून परिचित होते. विधानसभा निवडणुकीकरिता रिसोड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी न मिळाल्याने अनंतराव देशमुख दुसऱ्या पक्षाच्या शोधात होते, तसे त्यांनी प्रयत्नही केले होते. अखेर दोन्ही पुत्र व पदाधिकाऱ्यांसह १४ मार्च रोजी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याची आस देशमुख यांना लागून होती. मात्र, तसे झाले नाही. यामुळे नाराज झालेल्या देशमुखांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. देशमुख यांच्या बंडामूळे महायुतीची अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे. अनंतराव देशमुख यांच्या भूमिके विरुद्ध युवासेनेचे जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली.

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये दोन विधानसभा कारंजा आणि वाशीम हे भाजपकडे असून रिसोड विधानसभा मतदार संघात महायुतीकडून शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या आ. भावना गवळी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचे नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांना भाजपकडून छुपा पाठिंबा मिळत असून, उमेदवारी दाखल करण्याची सूचना त्यांना वारिष्ठांकडून मिळाली, अशी अफवा मतदार संघात सुरु आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अर्ज भरताना त्यांच्या सोबत होते. यामुळे या अफवांना महत्व प्राप्त होत आहे. त्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन रिसोड मतदार संघातील खोडसाळपणा बंद करावा, असे रवी भांदुर्गे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

… तर उर्वरित दोन मतदारसंघात वेगळा निर्णय घेऊ !

महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी यावर लक्ष घालावे. अन्यथा जिल्ह्यातील उर्वरित दोन मतदार संघात आम्हाला वेगळा विचार करावा लागेल! असा इशारा त्यांनी बोलून दाखविला. पत्रकार परिषदेत जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख, वाशीम विधानसभा प्रमुख विजय शेळके, युवतीसेना जिल्हासचिव अश्विनी भुजबळ, युवासेना शहराध्यक्ष रोहित वनजानी, वैद्यकीय सेल जिल्हासचिव भागवत सावके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »