बुलढाणा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी गत दोन दिवसात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीटमुळे तब्बल चार हजार १८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली आहे.

बुलढाणा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी गत दोन दिवसात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीटमुळे तब्बल चार हजार १८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली आहे. अवकाळीचा फटका रब्बीच्या शेवटच्या पिकांना बसला असून, यामध्ये मका, ज्वारी, कांदा, गहू व भाजीपाला अशा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी फळबागा बाधित झाल्याने शेवटच्या टप्यात उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने दोन एप्रिल पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट व जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, हवामानातील बदल आणि संभाव्य परिणाम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊसधारा कोसळल्या. सर्वाधिक नुकसान नांदूरा येथील शेतकऱ्यांचे झाले असून, यात मका पीक उध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेकांच्या घरावरील छत देखील उडाल्याचे चित्र दिसून आले.
पिके जमीनदोस्त
ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला, आंबा, केळी, संत्री, लिंबू, भुईमूग आदी फळपिके गत दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बाधित झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट येवून ठेपले आहे. घाटाखालील एका शेतकऱ्याच्या शेतातील मक्याचे पीक जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले होते.
१६६ गावे बाधित
बुलढाणा तालुक्यातील १४, चिखलीतील २, मोताळा – ९, मलकापुर – १२, खामगाव – ४२, शेगांव – ०, जळगाव जामोद- १०, संग्रामपूर – २८, नांदूरा- सर्वाधिक ४९ गावातील एकूण एक हजार ६५५ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अशा एकूण नऊ तालुक्यातील १६६ गावे अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.
जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील ओलसर वाऱ्यांचा मिलाफ होत असल्याचा परिणामामुळे राज्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हात वादळी पावसाची घंटा वाजण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.