देऊळगाव राजा : जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी जणजीवन विस्कळीत झाले आहे. इतकेच नाही तर, घरावरील छप्पर वादळी वाऱ्यामुळे उडाले, झाडे उन्मळून पडली, एका हॉटेलची भिंत कोसळली. यामध्ये सहा कामगार जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे भीषण चित्र मंगळवारी दुपारी देऊळगांव राजा तालुक्यातील दगडवाडी येथे दिसले.

तालुक्यातील दगडवाडी फाट्यावर असलेल्या वाटिका हॉटेल परिसरात वाऱ्याच्या जोरदार फटक्याने हॉटेलची पत्रे उडाली आणि भिंत कोसळली. यावेळी वाऱ्यापासून आणि पावसापासून बचाव करण्यासाठी हॉटेलच्या खोलीत अनेक जण थांबले होते. अचानक कोसळलेल्या भिंतीतून विटा व दगडांचा मारा झाल्याने सहा जण जखमी झाले. यामध्ये प्रल्हाद जायभाये, आदिनाथ जायभाये, संजय उगले (सिंदखेडराजा) आणि काही अन्य कामगारांचा समावेश आहे. विशेषतः सिंदखेडराजा येथील एका वेल्डिंग कामगाराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जालना येथे हलवण्यात आले आहे.
या वादळी पावसामुळे परिसरातील अनेकांची घरांवरील टिन पत्रे उडून गेली असून, काही घरांच्या भिंतीही कोसळल्या आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. दगडवाडी फाट्यावर असलेल्या पंकज लॉन्सची भिंत कोसळली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी एका लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती, त्यामुळे गर्दीही होती.
महिला किरकोळ जखमी
सुसाट वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह दगडवाडी येथील सुमित्रा अरुण नागरे नामक महिला शेतामध्ये असताना त्यांच्या जवळच वीज पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
प्रशासनाचे मदतकार्य
स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले होते. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडून नुकसानीचा प्राथमिक आढावा घेतला जात आहे.नैसर्गिक आपत्तीच्या झटक्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.