चिखली : शहरातील राऊतवाडी परिसरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी २१ सप्टेंबरच्या उत्तररात्री फोडले. तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी, दुपारी उशिरा एटीएमचे शटर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

अंकुश पाटील /चिखली : शहरातील राऊतवाडी परिसरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी २१ सप्टेंबरच्या उत्तररात्री फोडले. तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी, दुपारी उशिरा एटीएमचे शटर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. यानंतर, परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान पथक आणि ठसे तंत्रज्ञांचा वापर करीत तपासचक्र वेगाने फिरली. चोरट्यांनी अत्यंत चालाखीने व खबरदारी घेऊन ही धाडसी चोरी केल्याचे म्हटले जात आहे. एटीएममधील शिल्लक रक्कम आणि ग्राहकांनी काढलेली रक्कम याची तपासणी बँक अधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नसली तरी रोख रक्कमेसह तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे बोलले जात आहे. घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, दिवसेंदिवस नागरी वस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असल्याने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वृत्तलेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कॅमेऱ्यावर मारला स्प्रे…
अज्ञात चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारण्यापूर्वी सावधानता बाळगली. आधी एटीएम गृहातील सीसी कॅमेरावर काळा स्प्रे मारून बंद केले, त्यानंतरच चोरट्यांनी एटीएम फोडले. यामुळे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
