वाशिम : शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीसाठी आवश्यक असलेला मृत्यू दाखला देण्यासाठी २ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत डोंगरकिन्ही येथील शिपाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) बुधवारी, ११ मार्च रोजी रंगेहाथ पकडले. राजेश बळीराम बाविस्कर (वय ५४, रा. डोंगरकिन्ही, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदाराच्या आईचे निधन झाले असून शेतजमिनीची हिस्सेवाटणी करण्यासाठी मृत्यू दाखल्याची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत डोंगरकिन्ही येथे मृत्यू दाखल्याची मागणी केली असता, शिपाई राजेश बाविस्कर यांनी दाखला तयार करून देण्यासाठी २,५०० रुपयांची लाच मागितल्याचे सांगितले. पैसे दिल्याशिवाय दाखला मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार ११ मार्च रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने २,५०० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ला.प्र.वि.च्या पथकाने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान आरोपीने तडजोडीअंती २,००० रुपये लाच म्हणून स्वीकारली. तक्रारदाराच्या इशाऱ्यावरून पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान आरोपीकडून २,००० रुपयांची लाचेची रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद मारकंडे, योगेश खोटे, पोलीस शिपाई महेश परमेश्वरे व चापोशि. नाविद शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.