वाशिम : बुलढाणा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून, त्याची धग आता वाशिम जिल्ह्यातही पोहोचली आहे. १६ जून रोजी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी अडोळी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या निषेधार्थ दुचाकी जाळून आंदोलन केले.

यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी अशा जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली. वाढते उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव, नैसर्गिक आपत्तींचा फटका आणि वाढता कर्जबोजा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नसल्याचा आरोप करत, सरसकट कर्जमाफी हाच शेतकऱ्यांना दिलासा देणारा पर्याय असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील लाखो शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असून, अनेक कुटुंबांवर उपजीविकेचे संकट निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. दुचाकी जाळण्याच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.