Chhatrapati Sambhajinagar:रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अन्न आणि पाणी देण्याचं काम एका तरुणीकडून मागील चार ते पाच वर्षांपासून अविरत केले जात आहे. कोमल तसामड उर्फ जान्हवीच्या रुपाने छत्रपती संभाजीगरच्या रस्त्यावर ममत्वाचा झरा अविरत वाहताना दिसत आहे.
भगवान वानखेडे/ छत्रपती संभाजीनगर : इश्वराने जन्मास घातले तर मग तोच आपल्याला जगवेल असे आपण कधीतरी म्हटलेलेच असेल. परंतु हे म्हणणे छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर दिसून येत आहे. कारण, ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशा रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अन्न आणि पाणी देण्याचं काम एका तरुणीकडून मागील चार ते पाच वर्षांपासून अविरत केले जात आहे. कोमल तसामड उर्फ जान्हवीच्या रुपाने छत्रपती संभाजीगरच्या रस्त्यावर ममत्वाचा झरा अविरत वाहताना दिसत आहे.
कोमल तसामड वय वर्ष 20 ते 22 तील तरुणी. तिला छत्रपती संभाजीनगरात जान्हवी या नावाने ओळखले जाते. घरची बेताची परिस्थीती आणि त्यातही भाड्याने वास्तव्य करत असलेलं जान्हवीच्या कुटुंबातील तिचे वडील आणि ती खासगी नोकरी करतात. खासगी नोकरी करणारी जान्हवी मागील पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे नगर ते एन-2 चा संपूर्ण परिसर, महालक्ष्मी नगर, कामगार चौक, जय भवानी चौक या परिसरातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना सकाळी आठ ते दहा या वेळेत स्वतःच्या पैशाने खरेदी केलेले अन्न वाटत फिरते. तिची ही भूतदया छत्रपती संभाजीनगरकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारी अशीच आहे.
दूध भाकरी, ब्रेड आणि बरंच काही…
मागील पाच वर्षांपासून शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना जान्हवी रोज सकाळी न चुकता दूध, भाकरी, ब्रेड असा सकस आहार खाऊ घालते. अन्न रस्त्यावर जमिनीवर न टाकता तिच्याकडे त्यासाठी लहान-लहान अशी प्लास्टिकची टोपली असून, त्यामध्ये ती त्या भटक्या कुत्र्यांना अन्न भरवताना अनेकजण तिच्या या कृतीकडे पाहून अवाक होतात एवढे मात्र खरे.
कुत्र्यांनाही समजते जान्हवीची भाषा
जान्हवीचा वेळ आणि ठिकाण ठरलेला आहे. तेव्हा त्या -त्या परिसरातील भटकी कुत्री जान्हवीची रोज ठराविक वेळेला आईसारखी वाट पाहतात. जान्हवीची स्कुटी ठराविक चौकात थांबताच सगळी कुत्री तिच्या अवती भोवती गोळा होतात. जान्हवी त्या कुत्र्यांना नावाने बोलावते. कुणाचे नाव गट्टू तर कुणाचे राजा, एकाचे तर नाव तिने पिल्लू असे ठेवले आहे. जान्हवी आवाज देताच गट्टू असो की मग राजा निमुटपणे येतात आणि येथेच्छ भोजन करुन तृप्तीचा ढेकर देतात.
हा आहे या भूतदयेमागील उद्देश
जान्हवीला या तिच्या कार्याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, आजकाल रस्त्यावर घाण कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्या फिरतात. तेव्हा या भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर अन्नच सापडत नाही. त्यामुळे अनेकांना मी मरताना पाहिले आहे. त्यामुळे कुणीच अन्ना वाचून मरु नये यासाठी जमेल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न मी करत असल्याचे जान्हवी यावेळी सांगितले.