अकोलादेव : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाल्यानंतर पेट्रोलच्या टाकीचा स्फोट होऊन दुचाकी जळून खाक झाली. हा भीषण अपघात गुरुवार, 7 मे रोजी सायंकाळी टेंभुर्णीजवळील गणेशपुर पाटीजवळ घडला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तरुण गुरुवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवर टेंभुर्णीजवळील गणेशरपुर पाटीजवळून जात होता. त्यावेळी त्याची दुचाकी समोर जात असलेल्या कारला घासल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर जोरात आदळली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत संपूर्ण दुचाकी जळून खाक होऊन दुचाकीचा केवळ सांगाडा उरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकीचा स्फोट झाल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या भाजला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी केले आहे. तसेच जखमी तरुणाचे नाव समजले नसल्याचे त्यांनी सांगितले.