पैठण : तालुक्यातील ७४ जळगाव फाटा येथे घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर खुनाचे वळण मिळाले असून ढाकेफळ येथील विष्णू बबन मोरे (३४ वर्ष) याच्या हत्येप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण : तालुक्यातील ७४ जळगाव फाटा येथे घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर खुनाचे वळण मिळाले असून ढाकेफळ येथील विष्णू बबन मोरे (३४ वर्ष) याच्या हत्येप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव आप्पासाहेब काळे (२४ वर्ष), रा. ढाकेफळ, ता. पैठण या आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू मोरे याचा मृतदेह 21 मार्च रोजी 74 जळगाव फाटा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आला होता. मयत विष्णू मोरे याच्या अंगावर जागोजागी मारहाण केल्याचे व्रण असल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, मयत विष्णू मोरे याची आई पद्माबाई बबनराव मोरे (६५ वर्ष), रा. ढाकेफळ, ता. पैठण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वैभव काळे याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वैभव काळे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना हे करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांनी दिली आहे.


