नागपूर : शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

नागपूर : नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. या शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आला. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु, या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे 34 पोलीस जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी दिले.
शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. या संदर्भात 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 12 विधी संघर्षित बालक आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (व्हिडीओ क्लीप) च्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या असून एकही दंगलखोर यामधून सुटणार नाही, अशी सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, दंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या 250 पोस्ट शोधण्यात आल्या आहेत. या पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. अशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.