छत्रपती संभाजीनगर : रस्त्यात नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील प्रवासी महिलेसह चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावर घडला.

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यात नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील प्रवासी महिलेसह चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावर घडला. या अपघातात रिक्षाचालक रईस हासीम शेख (35 वर्ष), रा. रांजणगाव, रुक्मिणी येणगे (45 वर्ष), रा. रांजणगाव असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर शितल मोरे (24 वर्ष), पायल वरदे (19 वर्ष), दोघी रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव एमआयडीसी वाळूज अशी जखमी झालेल्या तरुणींची नावे आहेत.
बाबा पेट्रोल पंप चौकातून तीन रुक्मिणी येणगे, शितल मोरे, पायल वरदे या तिघींना घेवून रिक्षाचालक रईस हासीम शेख भरधाव वेगाने छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गाने एमआयडीसी वाळूज परिसरातील रांजणगावकडे मंगळवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास जात होता. त्यावेळी अहिल्यानगर मार्गावर रस्त्यात एक नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव रिक्षा पाठीमागून जाऊन धडकली. या भीषण अपघातात रिक्षाचक रईस शेख याच्यासह तिन्ही प्रवासी महिला रिक्षात अडकल्या होत्या. या अपघाताची माहिती आकाश माळी यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, पद्मपुरा अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय राठोड, डयुटी अधिकारी दिपराज गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक जवान
संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, छत्रपती केकान, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड, चंद्रसेन गीते आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यु टूल्सच्या मदतीने रिक्षाचालकासह प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी रिक्षाचालक रईस शेख, रुक्मिणी येणगे यांना तपासून मयत घोषीत केले. तर गंभीर जखमी झालेल्या शितल मोरे, पायल वरदे यांच्यावर उपचार सुरु असल्याचे घाटी रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
