नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल.
५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च
७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.
धार्मिक आणि पर्यटन स्थळे जोडली
समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटर अंतरावर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.