रिसोड : तालुक्यात अवैध सावकारी व्यवहाराबाबत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या दोन तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत सहकार व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने झडतीची कारवाई केली.

रिसोड : तालुक्यात अवैध सावकारी व्यवहाराबाबत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या दोन तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत सहकार व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने झडतीची कारवाई केली.
सहकार विभागाकडे प्राप्त तक्रारींच्या चौकशीसाठी गैरअर्जदार सचिन गणराजआप्पा गांजरे (रा. छत्रपती शिवाजी चौक, रिसोड) तसेच सुधाकर किसन टेकाळे (रा. चिखली, ता. रिसोड) यांच्या राहत्या घरी दोन स्वतंत्र पथकांमार्फत झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून सावकारी कायद्याअंतर्गत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक निबंधक गजानन फाटे (रिसोड), आर. आर. सावंत (प्रशासन), एम. डी. कच्छवे व पी. टी. सरकटे (पथक प्रमुख), सहकार अधिकारी एस. एस. पाटील, जे. एस. सहारे, मुख्य लिपिक पी. आर. वाडेकर, सहाय्यक सहकार अधिकारी कु. आर. एन. शेख, कनिष्ठ लिपिक ए. ए. बेले, व्ही. आर. ढोबळे, ए. डी. वानखेडे तसेच पोलिस व महसूल विभागातील कर्मचारी सहभागी होते. दरम्यान, नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहारांबाबत जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था वाशिम तसेच संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयात गोपनीय स्वरूपात तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रिसोड यांनी दिली आहे.
