Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
अमरावती : प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यासाठी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 जणांनी याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती, याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये? तसेच पुढील पाच वर्षांसाठी आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बजावली होती. तसेच 24 फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे व म्हणणे सादर करावे, असेही नोटीसमध्ये म्हटले होते. त्यात आता विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेत मोठा दणका दिला आहे.
बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा का सुनावली होती?
2017 साली नाशिकच्या सरकारवाडी पोलिस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. बच्चू कडू यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.