छत्रपती संभाजीनगर : फाजलपुरा परिसरातील एका हॉटेलबाहेर तरुणास फायटरने मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास सिटीचौक पोलिसांनी गजाआड केले.

छत्रपती संभाजीनगर : फाजलपुरा परिसरातील एका हॉटेलबाहेर तरुणास फायटरने मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास सिटीचौक पोलिसांनी गजाआड केले. मिर वासीफ अली नकी अली, रा. अल रेहमान कॉम्पलेक्स, एस.टी.कॉलनी, फाजलपुरा असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चाकू, फायटर आणि एक हजार रुपये जप्त केले असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी बुधवार, 30 जुलै रोजी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अब्दुल हुजैफ अब्दुल अली, रा. फाजलपुरा, जिल्हाधिकारी कार्यालय रोड हा तरुण 27 जुलै रोजी फाजलपुरा परिसरातील लिटील स्टार इंग्लीश शाळेसमोरील सोनुज कॅफे येथे चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी मिर वासीफ अली नकी अली याने चहा पिल्यानंतर चहाचे पैसे न देता शेख अब्दुल हुजैफ अब्दुल अली याला फायटरने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवित त्याच्या खिशातील 1 हजार दोनशे रुपये हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी शेख अब्दुल हुजैफ अली यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सिटीचौक पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सहाय्यक फौजदार मुनिर पठाण, पोलिस अंमलदार राजेंद्र साळुंके, बबन इप्पर, आनंद वाहुळ, मनोहर त्रिभुवन आदींच्या पथकाने मिर वासीफ अली नकी अली याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.
