District Administration and Kirloskar MoU: बिडकीन येथील शाळेत गोरगरीबांची मुले शिक्षण घेतात. दर्जेदार शिक्षण व संस्कारीत विद्यार्थी घडविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जोडीला प्रशासन आहे. या प्रयत्नात टोयोटा किर्लोस्कर सारख्या संस्थेचे योगदान नक्कीच मोलाचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी स्वामी यांनी बुधवार, 30 जुलै रोजी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन येथील शाळेत गोरगरीबांची मुले शिक्षण घेतात. दर्जेदार शिक्षण व संस्कारीत विद्यार्थी घडविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जोडीला प्रशासन आहे. या प्रयत्नात टोयोटा किर्लोस्कर सारख्या संस्थेचे योगदान नक्कीच मोलाचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी स्वामी यांनी बुधवार, 30 जुलै रोजी व्यक्त केला.
बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि.यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक सुदीप दळवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी आश्विनी लाटकर, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.डी. कांबळे, उपजिल्हाधिकारी विजय राऊत, संगिता राठोड, टोयटा किर्लोस्कर कंपनीच्यावतीने वरिष्ठ उपाध्यक्ष तथा संचालक सुदीप दळवी, जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी.एस. आदींची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध क्षेत्रात सहकार्य करुन जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ असा विश्वास यावेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला.
बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत सध्या मराठी माध्यमाची पहिले ते चवथी, उर्दू माध्यमाचे पहिली ते १० वी पर्यंत वर्ग आहेत. एकूण ८०० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. टोयोटा किर्लोस्कर मार्फत उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत १ हजार २०० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील इतकी क्षमता निर्माण करण्यात येईल. याशिवाय अन्य शैक्षणिक सुविधांची निर्मिती करण्यात येईल. या करारानुसार ३० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, खेळाची खोली, स्वयंपाकघर, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे. याशिवाय सुरक्षितता, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित मूलभूत शिक्षणाचे साहित्यही दिले जाणार आहे.
