बुलढाणा: देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखामेळा जलाशयातून रेतीचे उत्खनन सुरू असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. यावरून, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांनी नेमलेले पथक घटनास्थळी रवाना झाले. यावेळी काही वाळू तस्कर बोटीच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन करताना दिसून आल्यावर जिवाची पर्वा न करता पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेतली आणि वाळू तस्करांचा पाठलाग केला. 11 डिसेंबर रोजी झालेल्या या कारवाईत एकूण सात बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज उत्खननास प्रतिबंध असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून काही वाळू तस्कर उत्खनन आणि चोरटी वाहतूक करत असल्याचे समोर आले होते. याप्रकाराला आळा बसविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथक स्थापित करीत गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. दरम्यान, 11 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील संत चोखामेळा जलाशयात पोलिसांचे पथक पोहोचले. यावेळी काही इसम बोटीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करत असल्याचे समजले. यावेळी वेळ न दवडता पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी थेट जलाशयात उडी घेतली होती. यामध्ये, सात बोटी जप्त करण्यात आल्या.
दुसऱ्या बोटीने आरोपी फरार; 88.40 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला असता दुसऱ्या बोटीच्या मदतीने वाळू तस्कर फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र, सात बोटी, इंजिन, सिलिंडर, शेगडी, 4 ब्रास रेती वाळू असा एकूण 88 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत सहभागी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
कारवाई पथक
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, हेड कॉनस्टेबल शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, दिगंबर कपाटे, पोलीस कॉनस्टेबल अमोल वनारे, नीलेश राजपूत, मनोज खरडे, दीपक वायाळ, विकास देशमुख, निवृत्ती पुंड, पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या पथकाने सदरची कारवाई पार पाडली.