वाशिम : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करत नगर परिषदेला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनातून जमा झालेली १ हजार ६३२ रुपयांची रक्कम नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी गिट्टी उखडली आहे. त्यामुळे हा मार्ग अतिशय धोकादायक बनला असून अपघातांची संख्या वाढत आहे. याबाबत नगर परिषद व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही निधीअभावी काम होत नसल्याचे कारण देत दुरुस्ती टाळण्यात आली, असा आरोप नागरिकांनी केला. या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी १८ मार्च रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन करून या समस्येकडे लक्ष वेधले. नगर परिषदेच्या उदासीनतेचा निषेध नोंदवत आंदोलनातून जमा झालेली रक्कम अधिकाऱ्यांकडे देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
हे आंदोलन अजय मोतीवार यांच्या नेतृत्वात पार पडले. यामध्ये प्रतिक कांबळे, ओमप्रकाश फड, गजानन ठेंगडे, संतोष व्यास, संध्या सभादिंडे, छायाताई पवार, सखु बनसोड, भूषण देशपांडे, दिलीप भेंडेकर, भूषण मोरे, ताजू ठेकेदार, शाम दळवी, नंदू जैरव, किसनराव धोटे, संतोष इंगळे, आशुतोष वानखेडे, अमोल भेंडेकर, नरेश येल्हारे, शिवम घुगे, उद्धव मुंढे, गोलू गुप्ता, विजू पवार, मंगेश वानखेडे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.