लोणार : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या अधिकृत तैलचित्राची निर्मिती लोणारचे ज्येष्ठ कलाशिक्षक जगन्नाथ राठोड यांनी केली असून, या चित्रास संस्थेची तसेच शासनाची मान्यता मिळाल्याने समाजात आनंदाची लहर पसरली आहे. १६बाय २२ इंच आकारमानाचे हे तैलचित्र ऐतिहासिक दस्तावेजांच्या आधारे साकारण्यात आले आहे.

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थानचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज यांनी उपलब्ध करून दिलेली ऐतिहासिक कागदपत्रे, संत सेवालाल महाराजांचा इतिहास तसेच त्यांच्या अल्पशा ३४ वर्षांच्या आयुष्यमानाविषयीच्या माहितीच्या आधारे कलाशिक्षक राठोड यांनी हे चित्र साकारले. चित्रनिर्मिती प्रक्रियेदरम्यान संत रामराव महाराज, पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराज तसेच राजगडचे महंत रायसिंग महाराज यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. ट्रस्टी मंडळाने सोपविलेली जबाबदारी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास करून पूर्ण करण्यात आली. या तैलचित्रामध्ये संत सेवालाल महाराजांची तेजस्वी मुद्रा, साधेपणा, अध्यात्मिक तेज आणि समाजजागृतीचा संदेश प्रभावीपणे प्रतिबिंबित झाला आहे. पारंपरिक वेशभूषा, डोळ्यांतील करुणा आणि चेहऱ्यावरचे संतत्व यांचे जिवंत दर्शन घडविणारे हे चित्र पाहून ट्रस्टी मंडळाने एकमताने यास संस्थेचे ‘अधिकृत चित्र’ म्हणून घोषित केले. विशेष म्हणजे शासनानेही या चित्रास मान्यता दिली आहे.
विविध शासकीय उपक्रमात तैलचित्राचा वापर व्हावा
या ऐतिहासिक कार्यामुळे लोणार शहरासह संपूर्ण बंजारा समाजात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तसेच जयंती, पालखी सोहळे आणि विविध शासकीय उपक्रमांमध्ये याच अधिकृत तैलचित्राचा वापर करण्यात यावा, अशी नम्र विनंती संस्थानतर्फे करण्यात आली आहे.