Noel Tata as Chairman of Tata Trust : दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे आता ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष असतील. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. संचालक मंडळाच्या बैठकीत नोएल यांची निवड करण्यात आली.
मुंबई : दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे आता ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष असतील. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. संचालक मंडळाच्या बैठकीत नोएल यांची निवड करण्यात आली.
रतन टाटा यांच्या अधिपत्याखाली काम केल्यानंतर नोएल (६७) यांना आता ‘टाटा ट्रस्ट’चे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळेल. यामध्ये मुख्यत्वे रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट यांचा समावेश आहे, ज्यांचा एकत्रितपणे टाटा सन्समध्ये 66 टक्के भागभांडवल आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाच्या कंपन्यांची होल्डिंग आणि प्रवर्तक कंपनी आहे. नोएल हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळावर विश्वस्त आहेत. रतन टाटा (८६) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यानंतरच ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शोध सुरू झाला. उत्तराधिकारी निवडण्यासाठी टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक झाली आणि नोएल टाटा यांचे नाव निश्चित करण्यात आले.