वाशिम : शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. सीसी कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे तपासाची दिशा ठरवत अकोल्यातून आरोपीस ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी शनिवारी दुपारी १२ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, सीसी कॅमेरा फुटेज व गोपनीय यंत्रणेच्या माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

शुक्रवारी रेल्वे स्टेशन परिसरात एका ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, वाशिम शहर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात सदर महिलेच्या डोक्यात दगड मारून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली.
मृत महिला व आरोपी अनोळखी असल्याने ओळख पटवणे मोठे आव्हान ठरले. परिसरातील सुमारे ४० हून अधिक सीसी कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यामधून एक संशयित इसम दिसून आल्याने गोपनीय यंत्रणेला सक्रिय करण्यात आले. दरम्यान, मृत महिला पंचशील नगर, वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले. तपास पुढे नेत असताना संशयित आरोपी हा वाशिमचा रहिवासी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रिसोड नाका, मजूर अड्डा, बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात चौकशी करण्यात आली. गुन्ह्यानंतर आरोपी रेल्वेने अकोला येथे गेल्याची शक्यता लक्षात घेऊन एक विशेष पथक अकोल्यात रवाना करण्यात आले.
अकोला परिसरात शोध घेत असता संशयित आरोपी हा दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार (जि. अमरावती) येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. संबंधित गावात पथक पाठवले असता आरोपी काही दिवसांपासून गावात नसल्याचे समजले. अखेर, अकोल्यात तळ ठोकून असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर सर्च मोहीम राबवत १० जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत संतोष रामराव खंडारे (रा. अडुळा बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती) याने दारूच्या नशेत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वाशिम येथे आणण्यात आले.