निवडणूक काळात पैशांचा खेळ उघडकीस : जालन्यात चेकपोस्टवर पकडली ९८ लाखांची रोकड  

जालना :  आताच्या निवडणुका या सर्वसामान्यांच्या राहिलेल्या नाहीत, हे आता सर्वमान्य झाले आहे. निवडणुकीत पैसाच बोलतो, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे. निवडणूक काळात जालन्यात लावलेल्या चेकपोस्टवर तब्बल 98 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

जालना :  आताच्या निवडणुका या सर्वसामान्यांच्या राहिलेल्या नाहीत, हे आता सर्वमान्य झाले आहे. निवडणुकीत पैसाच बोलतो, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत पैशांचा पाऊस पडताना दिसत आहे. निवडणूक काळात जालन्यात लावलेल्या चेकपोस्टवर तब्बल 98 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोलनाक्यावर विशेष देखरेख पथकाने (एसएसटी) ही कारवाई केली. 

   नागेवाडी येथील  टोलनाक्यावर तैनात असलेल्या एसएसटी पथकाने शुक्रवारी ( एम.एच. २१ बी.एफ. ८७३३ ) क्रमांकाची ह्युंदाई क्रेटा कार संशयावरून थांबवली. वाहनाची कसून झडती घेतली असता, कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. मोजणीअंती ९८ लाख रुपये रोख सापडल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एसएसटी पथक व पोलिसांनी संयुक्तपणे पंचनामा करून रोकड जप्त केली. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड आढळल्यास आयकर विभागाला कळवणे बंधनकारक असल्याने, छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालक यांना तत्काळ माहिती देण्यात आली.

आयकर विभागाचा तपास पूर्ण होईपर्यंत ही रक्कम चंदनझिरा पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. दरम्यान, ही रोकड कुणाची, कुठून आणि कोणत्या उद्देशाने नेली जात होती, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व प्रलोभनमुक्त व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रमुख प्रवेशद्वारांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अवैध रोकड वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत असून, एसएसटी पथके चोवीस तास अलर्ट मोडवर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निवडणुकीत पैशांचा पाऊस? 

दरम्यान, जालना शहर महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे मातब्बर पक्ष स्वबळावर लढत आहेत. निवडणुकीत उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे मतांचा घोडेबाजार भरलेला आहे. मतांचे विभाजन टाळून ती आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांकडून सर्व हातखंडे वापरले जात आहे. यामध्ये पैशांचा पाऊस देखील जोरदार बरसत असल्याची चर्चा आहे. याकडे निवडणूक विभाग कशाप्रकारे लक्ष ठेवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »