वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) तात्काळ लागू करावे, या मागणीसाठी समस्त मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी वाशिम येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

‘अ, ब, क, ड’ वर्गीकरण तात्काळ लागू करा; शासनास निवेदन
वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) तात्काळ लागू करावे, या मागणीसाठी समस्त मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी वाशिम येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आर्य कॉलेजसमोरील भागात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मातंग समाजाची सध्यस्थिती, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तसेच आरक्षणातील उपवर्गीकरणाची आवश्यकता यावर भाष्य केले. अॅड. आर. यू. हनवते, समाजभूषण पुरस्कारप्राप्त शांताबाई हनवते, जगदीश मंवतकर, सुनील दळवे (लहुजी शक्ती सेना राज्य कार्यकारिणी सदस्य) आणि गोपाल जोगदंड (लहुजी शक्ती सेना जिल्हा सचिव) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण संविधानसुसंगत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील सर्वाधिक मागास, उपेक्षित आणि वंचित घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळण्यासाठी शासनाने तातडीने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी. मातंग समाजासह अनेक घटक आजही शिक्षण, नोकरी आणि प्रशासकीय क्षेत्रात अपेक्षित प्रतिनिधित्वापासून वंचित आहेत. आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समानपणे पोहोचविण्यासाठी उपवर्गीकरण हा प्रभावी मार्ग असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तसेच हे निवेदन राज्य शासनापर्यंत तातडीने पाठवून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. रमेश चंदनशिव (पश्चिम विदर्भ अध्यक्ष, लहुजी शक्ती सेना), मोहनराज दुतोंडे (जिल्हा प्रमुख), कैलास रणशिंगे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संतोष खंदारे (शहर प्रमुख), रवि गायकवाड (तालुका अध्यक्ष), गोपाल बाजड (तालुका सचिव), विजय लोंढे (राज्य कार्यकारिणी सदस्य) यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहर पोलिस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करू नये, यासाठी आर्य महाविद्यालयाकडील प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. पोलिस निरीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.


