महाराष्ट्र भूषण राम सुतार काळाच्या पडद्याआड: शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली :  जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. गुरूवारी दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. 

नवी दिल्ली :  जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. गुरूवारी दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळी मंत्री जयकुमार  रावल यांनी यावेळी आदरांजली वाहिली. रावल म्हणाले, जागतिक कीर्तीचे महान शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक ऐतिहासिक शिल्पांच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हुबेहूब आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांची शिल्पे ही त्यांच्या महान कार्याची नेहमी साक्ष देतील. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले महाराष्ट्राचे सुपुत्र राम सुतार यांचे शिल्पकला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह अनेक मान्यवरांचे पुतळे बनवले. त्यांनी दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या कलाकृती अजरामर राहतील. त्यांचे पुत्र त्यांचा वारसा चालवतील असेही आठवले यांनी सांगितले. अंत्यसंस्कारापूर्वी  स्व. सुतार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. 

त्यांच्या कलाकृती इतिहास जपल्या जातील : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की त्यांच्या कलाकृती नेहमीच भारताच्या इतिहास आणि संस्कृतीच्या शक्तिशाली अभिव्यक्ती म्हणून जपल्या जातील. मोदी म्हणाले, केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह भारताला अनेक उल्लेखनीय कलाकृती देणाऱ्या अद्वितीय शिल्पकार राम सुतार यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी राष्ट्रीय अभिमान अमर केला. त्यांची कामे कलाकारांना आणि सामान्य लोकांना सारखीच प्रेरणा देत राहतील.

 त्यांची शिल्पे शतकानुशतके जिवंत राहतील : मुख्यमंत्री फडणवीस 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुतार यांच्या पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, काहीच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ‘महाराष्ट्र माझा‘ गीताच्या ओळी उच्चारल्या होत्या, तेव्हा आम्ही भारावून गेलो होतो. वयाच्या 100 व्या वर्षीही ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांची शिल्पे शतकानुशतके जिवंत राहतील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »