Lok Sabha Elections: फळबाग योजना आम्ही सुरू केली होती. आज पाणी नसल्याने त्या फळबागा जळत आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान, मंत्री याकडे ढुंकूनही बघत नाहीत. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सत्तेचा गैरवापर करण्यासाठीच सत्ता वापरतात अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर : फळबाग योजना आम्ही सुरू केली होती. आज पाणी नसल्याने त्या फळबागा जळत आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान, मंत्री याकडे ढुंकूनही बघत नाहीत. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सत्तेचा गैरवापर करण्यासाठीच सत्ता वापरतात अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
ते शनिवार, 20 एप्रिल रोजी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्यातून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. शरद पवार म्हणाले की, देशाचे राजकारण योग्य रस्त्यावर आणायचे आहे. यासाठी देशपातळीवर आघाडी केली आहे. त्यासाठी पक्ष, खासदार नेते एकत्र आले आहेत. तर माझ्या हातात सत्ता द्या ५० दिवसांत महागाई कमी करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पण महागाई कमी करण्याऐवजी वाढतच गेली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. देशात आज बेरोजगारांची संख्या वाढली आहे. कधी नेहरू तर कधी राहुल गांधींवर टीका करणे हे सध्या सुरू आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर तुम्ही काय केले हे सांगितले पाहिजे. आज शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. शाळा कॉलेजमधून बाहेर पडलेले 100 पैकी 87 मुले आज बेरोजगार असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मात्र, याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नसल्याची टीका शरद पवार यांनी केली.