Chhatrapati Sambhajinagar News: महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा साठा करुन विक्री करणाऱ्या तीन जणांना गस्तीवरील आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी 3 लाख 57 हजार 940 रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा साठा करुन विक्री करणाऱ्या तीन जणांना गस्तीवरील आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी 3 लाख 57 हजार 940 रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केल्याची माहिती आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी रविवार, 27 ऑक्टोबर रोजी कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अथरोददीन सय्यद मजहरोददीन (50), सय्यद मुजाहेद सय्यद फारुख, सय्यद फारुख, सर्व रा. मोतीकारंजा अशी अवैधरित्या गुटख्याचा साठा करुन विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. आर्थिक गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, उपनिरीक्षक अशोक अवचार, चंद्रकांत कामठे, सहाय्यक फौजदार किशोर महाजन, पोलिस अंमलदार सय्यद शकील, पांडूरंग मोरे, सखाराम मोरे, परमेश्वर भोकरे, अभिजित गायकवाड, बाबासाहेब भानुसे, संदीप जाधव, वर्षा शिरसाठ आदींचे पथक शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गस्तीवर असतांना त्यांना माहिती मिळाली होती, की मोतीकारंजा परिसरातील हरि मस्जीदजवळ एका घरात महाराष्ट्रात प्रतिबंधीत करण्यात आलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला असता, सय्यद अथरोददीन सय्यद मजहरोददीन, सय्यद मुजाहेद सय्यद फारुख, सय्यद फारुख यांच्या घरातून जवळपास 3 लाख 57 हजार 940 रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग, आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने केली.